बेनीगिरी शिवालय, महाल, नागपूर
नागपूर शहराच्या व्यस्त महाल परिसरात चिटणीस पार्कच्या उत्तरेस बेनीगिरी शिवालय मंदिरांचा समूह आहे. हे शिवालय मूलतः दशनामी संप्रदायाचे साधू गिरी गोसावी यांचे समाधी स्थळ आहे त्यांचे आद्यगुरु बेनीगिरी महाराज यांची मुख्य व भव्य समाधी मंदिर आहे तसेच इतर मंदिरे ही त्यानंतर गादीवर आलेल्या भक्त संप्रदायातील मुख्य साधूंची आहेत.
मुख्य बेनेगिरी मंदिर हे मंदिर परिसराच्या दक्षिण पश्चिमेस आहे व तेथे बेनीगिरी महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती अशी आख्यायिका सांगण्यात येते. व संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक समाधीवर शिवलिंग त्यासमोर नंदी आणि त्याच्या विरुद्ध दिशेला गणपती अन्नपूर्णामाता व नागाची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्य मंदिरातील शिवलिंगाखाली संगमरवरी श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे व त्याच्याच बाजूला उत्तरमुखी नंदी अशा या दोन गोष्टीवर शिवलिंग विराजमान आहे.
मुख्य बेनेगिरी शिवमंदिर हे तीन स्तराचे बनलेले आढळते पहिला स्तर हा पायव्याचा व दुसरा स्तर हा भव्य आणि उंच चौरस ओटा आहे जो वालुकीयखडकाने सांधला गेलेला आहे व त्यावर उत्तम नक्षीकाम केलेले आढळते तर तिसऱ्या स्तरावर मंदिर आहे जे पहिल्या स्तरापासून चार ते पाच फूट उंचीवर आहे.
अत्यंत आखीव रेखीव व प्रमाणबद्ध असलेले हे शिवालय त्याच्या कळस व शिखराच्या आकारामुळे उत्तर भारतीय नागरशैली मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना असल्याचे आढळते. चौरस गाभारा असलेल्या मंदिराला प्रत्येकी चार दिशांनी छोटे आयातकृती वऱ्हांडे आहेत ज्यामुळे मंदिराची रचना ताराकृती बनते ज्याला चोवीसपदब्रम्ह,
एकशेचौरेचाळपदी वास्तुविण्यास म्हणतात. संपूर्ण मंदिरात वीस खांब व चोवीस कमानी आणि त्यावर गोलाकार घुमट (ribbed dome) आहे, गोल खांब व बहुकेंद्रीय (मल्टीसेंटर आर्च) कमानी त्यावर आडवे जोडलेले दगडी ओंडके (स्लॅब) अशी चौकट (trabeated) ही हिंदू पद्धतीचे बांधकाम असल्याची खास ओळख आहे व एकावर एक अशी दगडांची एकंदरीत रचना ही यादवकालीन हेमाडपंथी पद्धतीची असल्याचे जाणवते ही पद्धत गोंड व भोसल्यांनी पुढे वापरली असली तरीही सदर मंदिर हे त्यापूर्वीचे असावे कारण यात वापरण्यात आलेला पिवळा वालुकाखडक हा स्थानिक वैनगंगेच्या खोऱ्यातील असल्याचे जाणवते व आता त्याची झीज सुरू झालेली आहे, त्यावर केलेली कलाकुसर ही मुख्यत्वे राजपूतानातील छत्री वा मंदिर पासन प्रेरित जाणवते त्यामुळे सदर कालावधी हा जाटबागोंड उमेदीतील किंवा समकालीन गवळी राजांच्या पतन कालावधी चा (ई.स. १६०० ते १७०० ) असावा असा कयास आहे. मंदिरावरील कोरीव काम हे प्राणी पक्षी व वेलबुटींनी परिपूर्ण आहे ज्यामध्ये मोर, पोपट, माकड, घोडे, हत्ती, सिह, कमळ व दगडातच कोरलेली लोखंडी साखळी अशा आकृत्या पहावयास मिळतात बहुतांश हिंदू मंदिरामध्ये मानवी आकृती ज्यामध्ये देवगण यक्ष किन्नर मदनिका इत्यादी बघायला मिळतात परंतु या मंदिरात क्वचितच मानवी आकृती कोरलेली मिळाली जी मंदिराच्या चार दिशेच्या मुख्य वऱ्हांडाच्या वरती आढळते व ज्यामध्ये दाढीदारी गोसावी दर्शवण्यात आलेला आहे हे याचे वैशिष्ट्य आहे.



सदर मंदिर आज सुस्थितीत असले तरीही ते जीर्ण होण्याच्या मार्गावर आहे, मंदिराच्या दगडाची झीज थांबविण्यासाठी आजाण भक्तांनी त्यावर चुना व पांढरा रंग पोतला आहे ज्यामुळे त्याचा मूळ पिवळा रंग व वालुकाखडकाचा खरा दानेदार पोत (texture) बिघडला आहे, ह्या अमूल्य अश्या वारसा स्थळाचे जतन होणे गरजेचे आहे व म्हणूनच महानगर पालिका नागपूर ने या मंदिराला आपल्या वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केलेले आहे परंतु त्याकरिता ठोस असे नियोजन अजून झालेले नाही जे गरजेचे आहे.
© आर्कीटेक्ट प्रतिक पुरकर, नागपुर
संदर्भ:
१. डॉ. भा. रा. अंधारे कृत देवगड चे गोंड राजे २००४
२. यादव माधव काळे कृत नागपूर प्रांताचा इतिहास १९३४
३. स्थानिक सजग नागरिकांनी दिलेली माहिती.
४. Vibhuti Chakrabarti, 1998, Indian Architectural Theory, contemporary use of vastu vidya
५. Pratik P. Purkar, 2023, Critical Appraisal Of Traditional & Contemporary Housing Typologies In India: Through Ancient Treaties On Housing.
६. TPS 2491/1835/CR-86/91/UD-9, Dated 16th December 2004, List of Heritage Buildings and Conservation Areas)
स्थळदर्शक नकाशा