Contact

Email Address: pratiqppurkar@gmail.com
Call: 8600430005

logo

logo

Sunday, October 28, 2018

मार्कंडादेव मंदीर, चामोर्शी

#Markanda Mahadev #Markand Dev Chamorshi Garchiroli maharashtra 

विदर्भातील प्रति खजुराहो म्हणवले जाणारे मार्कंडादेव मंदिर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात तालुका चामोर्शी पासून जवळच वैनगंगा नदीच्या तीरावर आठव्या शतकात बांधल्या गेले आहे. हे मंदिर शैव संप्रदायाचे असून भगवान शंकराच्या पूजा-अर्चना करिता बांधलेले आहे या मंदिराचे नामकरण हे हरियाणातील मार्कंड ऋषींच्या नावावर आहे.
सद्यस्थितीतले छायाचित्र
संग्रहित जुने छायाचित्र गुगल वरुन

येथे स्थानिकांत अशी आख्यायिका सांगण्यात येते की भगवान शंकराच्या कृपेने जन्म घेतलेले मार्कण्ड ऋषी हे वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्यूला सामोरे जाणार होते आपल्या वडिलांच्या इच्छेखातर वयाच्या चौदाव्या वर्षी मार्कंडेय ऋषींनी येथे शंकराची तपश्चर्या केली यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी मार्कण्ड ऋषी चा वयाच्या सोळाव्या वर्षि होणारा मृत्यू परतवून लावून त्यांना चौदा कल्प जीवनाचा आशीर्वाद दिला.
पूर्व विदर्भातील सर्वात मोठ्या अशा वैनगंगा नदीच्या तीरावर चामोर्शी पासून सात किलोमीटर दूर या ठिकाणी हे मंदिर चौदा एकर परिसरात विस्तारलेले आहे, येथे दक्षिणेकडे वाहणारी नदी उत्तर वाहिनी आहे या मंदिराला वळसा घालून परत हि नदी दक्षिणवाहिनी होते, या मधील उंचवट्यावर हे मंदिर वसलेले आहे.
 
मंदिराचे आयुष्य साधारणता बाराशे वर्ष आहे हे मंदिर आठव्या शतकात एलिचपूर सध्याचे अचलपूर येथे राजधानी असलेल्या राष्ट्रकूट राजे यांच्या काळात बांधल्या गेल्याचे आढळते. मंदिराचे बांधकाम हे स्थानिक बसाल्ट दगडाचे आहे नदीच्या पात्राजवळच आढळणारे हे काळे, लालकाळे दगड सांधुन एकमेकांवर रचलेले आढळतात व त्याकरिता चुना व इतर नैसर्गिक चिकट रसायन घटक म्हणून वापरले आहेत व त्या आधारे दगड एकमेकांवर रचून नंतर कोरीव काम करण्यात आले आहे मंदिराचा बाह्य भाग यावर कलाकुसर व कोरीव काम क्वचितच आढळते किंबहुना ते टाळलेले दिसते. एकंदरीत रचनेवरून हे मंदिर हेमाडपंथी बांधकाम शैली चे जरी वाटत असले तरीही ते तसे नाहीये कारण दगडांना जोडण्याकरिता वापरण्यात येणारे चुना व ईतर रसायनांचे मिश्रण हे हेमाडपंथी शैलीत आढळत नाहीत व ही शैली यादव कालीन आहे राष्ट्रकूटांची नाही, परंतु मंदिर हे टणक दगडात असूनही अत्यंत आखीव-रेखीव व सुबक बांधण्यात आलेले आहे.
सदर परिसरात मुख्य मंदिरा सोबतच इतरही मंदिर आहेत ज्यामध्ये दशावतार मंदिर, मारुती, गणपती व इतरही आहेत परंतु मुख्य मंदिर हे भगवान शंकराचे म्हणजेच मार्कंडेय या नावाने प्रसिद्ध आहे जे साधारण दोनशे वर्षांपूर्वी विद्युल्लतापातामुळे भंग पावले होते त्याचा जीर्णोद्धाराचे काम आता पुरातत्व विभाग भारत सरकार च्या अंतर्गत सुरू आहे हे मंदिर व परिसर यापूर्वीच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
कळसाचा आकार व शैली ही उत्तर भारतीय मंदिराप्रमाणे आढळते ज्या खाली शिखरावर क्लिष्ट पद्धतीचे जाळीदार किंबहुना गुढ वाटावे असे कोरीव काम केलेले आहे. मंदिर व सभामंडपाच्या पृष्ठभागावर चीतारण्यात आलेल्या कोरीव शृंगारिक भावातील मूर्त्यांमुळे यास प्रति खजुराहो अशी बिरुदावली मीळाली आहे परंतु ह्या मुर्त्यांचा भाव उत्सवी स्वरूपाचा आहे  रतिक्रिडा वा मिथुनरत नाही ज्यामध्ये वस्त्रालंकारीत ब्रम्हा, विष्णू व महेश तिघेही सपत्नीक चीतारण्यात आलेले आहे, सोबतच विविध प्राणी पक्षी व देव गंधर्व यक्ष यांच्या प्रतिमा पाहण्यास मिळतात या सर्व प्रतिमा एक पुरुष उंचीवर कोरण्यात आलेल्या आहे, साधारणता पुर्ण वाढ झालेल्या संसारी पुरुष व स्त्रिया यांच्या नजरेच्या टप्प्यात भराव्या अशा ठिकाणी त्या आहेत व सपत्नीक त्रिमूर्ती देखील हेच दर्शविते कि हे मंदिर संसारिक स्त्री पुरुषांकरिता इतर मनुष्य,पशू पक्ष्यांसह आनंदित राहण्याचा व दीर्घ आयुष्य जगण्याचा जसा साक्षात्कार मार्कण्ड ऋषीना झाला तसा मार्ग सांगतात. यातील बहुतेक शिल्प आपल्याला इतर हिंदू मंदिरातही आढळतात ते येथेही आहेत जसे हत्ती वर विजय मिळवित असलेल्या मुद्रेतील सिंह जो प्रत्येक मंदिरात दर्शनी स्थानी असतो जो भाविकांना मार्ग दाखवितो अशीच त्याची रचना असते तसेच कोपऱ्यांवर आढळणारे यक्ष किन्नर यांच्या मुर्त्या मध्यभागी असलेल्या मुख्य देवतांच्या मुर्त्या यादरम्यान नृत्य,गायन,वादन ह्या मुद्रेतील मग्न नर्तिका चितारलेल्या आहेत.
एकंदरीत उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असलेल्या या मंदिरामुळे आपले तत्कालीन कला, स्थापत्य ज्ञानामुळे राजकीय, सामाजिक आर्थिक स्थितीची कल्पना येते मूर्तीवरील अलंकार वस्त्र हे तत्कालीन लोक जीवनाचा आढावा देतात त्यामुळेच असे हे पुरावे जतन करणे आवश्यक आहे व भारत सरकार पुरातत्व विभागाने याचा जो पुनर्विकास चालवलेला आहे तो योग्य आहे त्याकरिता आपल्या सरकारला धन्यवाद.

प्रतिक पुरकर. नागपूर

Thursday, October 4, 2018

कार्पेट, बिल्टअप, सुपर बिल्टअप आणी सेलेबल

कार्पेट, बिल्टअप, सुपर बिल्टअप आणी सेलेबल

बऱ्याचदा गिऱ्हाईकांशी बोलताना असा अनुभव येतो कि ते कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया, व सुपर बिल्टअप एरिया यामधील फरक टक्केवारीने किती असावा याबद्दल विचारणा करतात.

अशा गिऱ्हाईकांना योग्य माहिती देणे हे मी आर्किटेक्टचे कर्तव्य समजतो. बहुतांश बिल्डर यातील तफावतिचाच फायदा घेऊन आपले स्वतःचे गल्ले भरतो व आपल्याकडंन पैसे उकळतो अशी भावना  होते, करिता हा लेख प्रपंच.

सर्वप्रथम बघू या कार्पेट एरिया ऊर्फ चटई क्षेत्र म्हणजे काय? तर चार भिंतीच्या आत जिथे चटई अंतरता येते ते चटईक्षेत्र. तर चटई क्षेत्रासोबत चारही भिंती चे क्षेत्रफळ म्हणजे बिल्टअप एरिया. तर चटईक्षेत्र सोबत चारही भिंतीच्या एरिया सकटच इतर सामाईक वापराच्या जागेचे क्षेत्रफळ म्हणजे सुपर बिल्टअप एरिया. या सुपर बिल्टअप एरिया सज्ञेला कुठलाही कायदेशीर आधार नाही तर ही विकासकांनी आपल्या सोयीकरिता बनवलेली सज्ञा आहे.

विकासक हा तुम्हाला विकलेल्या गळ्याला कार्पेट एरिया प्रमाणे विक्री करण्यास बाध्य आहे परंतु तो गाळा बांधण्याकरिता भिंती व कॉलमची सुद्धा आवश्यकता असते म्हणून रेरा कायद्यानेही हा भाग समाविष्ट केलेला आहे परंतु विकासक याव्यतिरिक्तही महत्त्वाचे बांधकाम करत असतो जो आराखड्याचा हिस्सा असते व इतर सुविधांकरिता महत्त्वाचा देखील असतो ज्यामध्ये पॅसेज, जिना, लिफ्ट, कॉमनटेरेस व पार्किंग, सोसायटी ऑफिस, मिटर रुम, पाण्याची टाकी, वगैरे इत्यादी  भाग असतात याकरिता लागणारा एरीया विकासकास कुठे मुफ्त तर कुठे विकत घ्यावा लागतो व बांधकामाकरिता ही खर्च करावा लागतो, याकरिता लागलेला खर्च कार्पेट एरिया वर लोड करून त्याने तो विकावा अशी सर्वसाधारण समज आहे व कायदाही त्याला हे ठरविण्याचा अधिकार देतो. परंतु गि-हाईकास कारपेट याव्यतिरिक्तही त्याच्या सेवेत किती एरिया बिल्डरने बनवलेला आहे ही माहिती देण्याकरिता या सुपर बिल्टअप एरिया सज्ञेचे प्रयोजन आहे विक्रीकरिता नाही.

थोड्याफार फरकाने हा सुपर बिल्टअप एरियाच सेलेबल एरीया म्हणून गि-हाईकांना दाखविला जातो ह्या आणि अशा प्रकारचे एरिया आम्ही आर्किटेक लोकच विकासकांना काढून देत असतो व त्याचे त्या प्रमाणात टक्केवारीने कार्पेट एरियाशी सांगड घालून देतो जी जवळपास 20 ते 35 टक्के सुद्धा असू शकते त्यामुळे कार्पेट एरिया च्या किती प्रमाणात सुपर बिल्टअप आहे हे ठोस सांगता येणे शक्य नाही, ते सर्वस्वि इमारतीचा आराखडा व सुविधा यावर अवलंबून आहे.

बिल्डर जर या व्यतिरिक्त इतर जागा आपल्या कार्पेट एरिया सोबत जोडून आपणास विक्री करत असेल तर ते व्यवस्थित खात्री नुसार माहिती करून व त्याची कायदेशीर वैधता तपासून आपण खरेदी करावी.

प्रतिक पुरकर, नागपुर